मागच्या एका पोस्टमध्ये ‘ वेबसाइटसदृश ब्लॉग’ असा मी उल्लेख केला होता. हा काय प्रकार आहे? थोडक्यात सांगायचे तर, imageवेबसाइट सारखा दिसणारा पण वेबमास्टरची मदत न घेता आपल्या आपण अपडेट करू शकू असा ब्लॉग. साधारणतः कोणताही ब्लॉग उघडल्यावर समोर दिसते ती त्यावरची सगळ्यात ताजी पोस्ट. स्टॅटीक वेबसाइट वर मात्र एक ठराविक पेजच नेहमी उघडले जावे अशी सोय असते. समोर नियमित एक ठराविक पेज उघडले जावे खेरीज ताज्या पोस्टमार्फत आपल्या ग्राहकांशी सतत संपर्क साधता यावा अशी देखील सोय ब्लॉगवर करता येऊ शकते. त्यामुळे, एकदा ब्लॉग तयार केल्यावर त्याला त्याचे डोमेन नेम जोडले की ग्राहकांना कळणार ही नाही की ही वेबसाइट नसून एक ब्लॉग आहे.

आता आपल्या व्यवसायाकरता रीतसर वेबसाइट बनवून न घेता कुणी ब्लॉग कशाला बनवून घेईल? तर त्याकरता काही मुद्दे असे आहेत….
– ब्लॉग चालू ठेवण्याकरता डोमेन नेम आणि वेब स्पेस असणे आवश्यकच आहे असे नाही. त्यामुळे ज्यांना हा खर्च करणे योग्य वाटत नाही; ते देखील ब्लॉग माध्यमामार्फत व्यवसायाचे वेब अस्तित्व निर्माण करू शकतात.
– काही सेवा व्यवसायात ग्राहकांना त्या सेवेची पूर्ण माहिती मिळण्याकरता, व्यावसायिकाकडून अधिक आणि नियमित लेखनाची गरज असते. उदाहरण म्हणून वीणा वर्ल्ड च्या वीणाताई पाटील यांचे दर रविवारी महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रातून एकेक लेख प्रकाशित होत असतात. खरं सांगायचे तर त्यांचे आज पर्यटन व्यवसायात इतके मोठे नाव आहे की त्यांना अश्या प्रकारे दर आठवड्याला लेख लिहून प्रसिद्धीची अजिबात गरज नाही. पण तरीही त्यांचे, त्यांच्या व्यवसायाशी निगडीत एखादी अडचण घेऊन व्यवस्थापनाचे धडे देणारे लेख दर आठवडयाला वाचायला मिळतात. त्यातून ग्राहक/वाचक त्या व्यवसायाशी अदृश्यरीत्या बांधला जातो, त्या विशिष्ट व्यवसायातल्या खाचाखोचा ग्राहकांना घरबसल्या कळतात. याच व्यवसायात नव्याने येऊ पहाणा-या नवख्या व्यावसायिकाला होऊ पहाणा-या चुका ध्यानात येतात. सगळ्यात मोठ्ठा फायदा त्या मूळ व्यवसायाला होतो – ग्राहकांशी बांधिलकी रहाते, समस्या उघडपणे मांडल्याने व्यवहारात पारदर्शकता येते.
– जागेचे बंधन नसल्याने, अमर्यादित लेखनाकरता ब्लॉगचा वापर करता येतो.
– ज्यांना लॉग इन करून आपले लिखाण पोस्ट करणे त्रासाचे वाटत असल्यास ईमेल द्वारे सुद्धा पोस्ट टाकता येऊ शकते.
– वेगवेगळ्या सोशल मिडीयाशी जोडलेले असाल तर तिथेही आपले लिखाण आपोआप पोस्ट करता येऊ शकते.

मला वाटते, एखाद्या ब्लॉगची सुरूवात करायला हे इतके मुद्दे पुरेसे आहेत. त्यातूनही तुम्हाला धाडस नसेलच होत, तर अवश्य माझ्याशी संपर्क साधा.


You may want to read following Posts related to same topics :-

Advertisements